गुरुवर्य कै. र. गो. बोडस ह्यांच्या लेखनवहीतून---
जीवन आणि मृत्यु ही विरोधी सत्य आहेत मग जीवनाची पूर्णना मृत्यु झाल्यावर कशी होईल? मृत्यु हा जीवनाचा अंत नसून जन्माचा अन्त आहे, आणि तो सरतेशेवटी येतो म्हणून आपण मृत्यु देहान्तात येतो असे समजता कामा नये. जन्मामध्येच मृत्यु उपस्थित आहे.
जन्मलेल्या दिवसापासूनच मृत्यु येत असतो जन्मानंतर आपण प्रतिक्षणाला मरत असतो. ही मरणप्रक्रिया ज्या दिवशी पूर्ण होते त्याला आपण मृत्यु म्हणतो. जन्मामध्ये तो बीजरूपाने असतो तर शेवटी तो पूर्णरूपात प्रकट होतो. म्हणून जन्मानंतरचे काहीही निश्चित नाही पण मृत्यु मात्र अवश्य आहे. ह्याचे कारण त्याचे आगमन जन्माबरोबरच झालेले असते.
जातस्य हि ध्रुवो मृत्यु: । जन्म हे त्याचे दुसरे नाव आहे, त्याचेच बीजरूप आहे. ज्या दिवशी आपण जन्मतो तेव्हापासूनच निरंतर मरत आहोत. ज्याला आपण जीवन म्हणून जाणतो ते जीवन नाही तर क्रमाने आणि धीमी अशी ती मृत्यूची प्रक्रिया आहे.
जीवनाच्या ऐवजी मृत्युशीच आपण जास्त परिचित असतो म्हणून पूर्णवेळ त्याच्यापासून बचाव करण्यात घालवतो. आमची सारी योजना सुरक्षिततेसाठी आणि आत्मरक्षणासाठीच असते. मृत्युच्या निकटतेमुळे मानव धार्मिक वृत्तीचा बनतो. वृद्धावस्थेत ही धार्मिकता वाढीस लागते परंतु ही धार्मिक नसून मृत्यु-भयाचे एक रूप आहे, सुरक्षेचा एक अन्तिम उपाय आहे.
वास्तविक धार्मिकता ही मृत्युभयातून निर्माण होत नाही तर ती जीवनानुभवातून जन्माला येते.
शरीर प्रतिक्षणाला मरत असते. विनाशधर्म असलेल्या देहाविषयी आपण विशेष जागरूक असल्याने मृत्यूचाच अनुभव आपण करीत असतो.
जीवन जाणून घेतले पाहिजे कारण त्याचा जन्म झालेला नाही व म्हणून त्याला मृत्युही नाही. हे सत्य जन्मापूर्वी तसेच मृत्योनंतरही असतेच. जीवन जन्म आणि मृत्यू ह्यांच्यामध्ये नसून जन्म आणि मृत्यू ह्या घटना त्यामध्ये घडतात.
ध्यानावस्थेत चित्त शून्य आणि शांत होते तेव्हा देहाहून भिन्न भिन्न तत्त्वांचे दर्शन होते. चित्ताच्या अशांतीमुळे त्यांचे दर्शन घडणार नाही.
शरीर हा केवळ माझा निवास आहे. सरे काही माझेच अशी प्रतीति येऊ लागते, माझी सत्ता आणि माझे जीवन असा भ्रम निर्माण होतो. माझ्या जीवनाची इतिश्री मी देहापुरतीच मानू लागतो. हा देहाभास, हे देहतादात्म्य जीवनाच्या वास्तव दर्शनाच्या आड येते आणि क्षणाक्षणाला जीवन घटत जाणार्या देहाच्या क्रमिक मृत्युलाच जीवन समजतो. अंधःकाराचे तरंग जाऊन चित्त निस्तरंग होईल तेव्हा प्रथमच आपल्या देहात निवास करणार्याशी आपली ओळख होते.
देहाभिमानी मनुष्याच्या जीवनाला कधीच प्रारंभ होत नाही कारण तो एका स्वप्नात, निद्रेत अथवा मूर्च्छेत असतो. या मूर्च्छेतून जागृती आल्याशिवाय स्वतःच तो त्याची सत्ता, आधार आणि जीवन आहे याचा त्याला बोध होत नाही. अशी जिवंत मृत माणसे मृत्यूपासून आपले रक्षण करण्यासाठी धडपडत असतात व म्हणून त्यांच्यामध्ये असलेल्या अमृतत्वाला - ज्याचा कधी मृत्यू नाही - ते जाणत नाहीत.