गुरुवर्य कै. र. गो. बोडस ह्यांच्या दि.15-5-1979 च्या पत्रामधून…
'उद्धरेदात्मनात्मनात्मानं' ह्या गीतेच्या 6 व्या अध्यायाच्या 5 व्या श्लोकामध्ये अद्वैतपर्यवसायी आर्यधर्माचा सारा जोम आलेला आहे. `जर स्वतःला तुला उद्धार करून घ्यायचा असेल तर आत्मसाहाय्याने तू आपला उद्धार कर.' `आत्म्यासारखा बंधु नाही' या वाक्यातील सर्वज्ञतेचे सारसर्वस्व त्यात ओतप्रोत भरलेले आहे.
'उद्धरेदात्मनात्मनात्मानं' ह्याचा अर्थ Self Help. याचा मागोवा घेताना what you are (तू कसा आहेस?) आपल्या अधिकारयोग्यतेनुसार व निरपेक्ष बुद्धीने संकल्पत्याग (कारण संकल्पलोपात जीवाला ब्रह्मत्व आहे) व आत्मप्रयत्नपूर्वक कर्तव्याचरण याची कास धरायला हवे. त्यागाने लाभ होतो; निष्काम त्यागाने महत्तम लाभ होतो.
या दोन्ही तत्त्वांचा आपण प्रत्यही द्रोह करीत असतो. क्रमाक्रमाने या दोहोंची जागा निष्ठा घेते आणि आत्म्यावर आलेले अज्ञानाचे पटल नाहीसे करणार्या ईश्वरविषयक योगावर आपण आरूढ होतो. आत्म्याचे स्वरूप जाणून घेतल्याने 'तत्त्वमसि' या महावाक्याचे उद्बोधन होते.
व्यवहारस्थितीत त्वं = जीव = उपाधिग्रस्त आत्मा = वासना, अभिमान परिच्छिन्न ज्ञान, कर्तुभोक्तृत्वादि अभिमानी जीवात्मा (अज्ञानी आत्मा) अशी स्थिती असते.
परमार्थस्थितीत त्वं = तत् = आत्मा = परमात्मा = अव्यय ब्रह्म, ही स्थिती असते.
एकाग्रचिंतन व ब्रह्मीभवन ह्यांच्या साहाय्याने उपाधींचे निरामय शून्यत्वं होते. त्वं पदस्थ वस्तु शुद्ध होऊन ब्रह्मस्वरूप अखंडत्वाने पावते. यात शुद्धिकरणाची प्रक्रिया आहे.
No comments:
Post a Comment