को गुरु अभिगतत्वा:
शिष्यं हितयोद्यता सततम् ।।
- श्री आद्यशंकराचार्य ‘प्रश्नोत्तररत्नमालिका’
‘गुरु कोण?’ ‘ज्याला सत्याचा साक्षात्कार झालेला आहे आणि जो शिष्याच्या कल्याणार्थ सतत तत्पर असतो.’
(न्यायरत्न धुं. गो. विनोद ह्यांचे शिष्य कै. रत्नाकर गोविंद बोडस ह्यांचा अनुग्रह मला लाभला ही माझ्या मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. वेदातील गूढगायत्री छंदाविषयी संशोधनात गढलेले असताना 1982 साली त्यांना देवाज्ञा झाली. कै. र. गो. बोडस ह्यांनी मला पाठविलेल्या कृपापत्रांमधील काही भाग ह्या अनुदिनीवर मी उद्धृत करीत आहे.)
"(जिज्ञासूच्या म्हणण्याचा) आशय पाहता जीवनाच्या विविध स्तरावरील अनेकविध सहभाव असणाऱ्या वस्तूंची, त्याच्या पूर्वऐतिहासिक, अतीत अनागत अनुभूतींची त्याला बैसका आहे. त्यात तत्त्वज्ञान, साहित्य, सौंदर्यशास्त्र, विज्ञान, काव्य, निसर्ग, मानवी मन, विविध-कला ह्यांच्या विविध सूक्ष्म छटा आणि उभे आडवे बंध आहेत असे दिसून येते.
या साऱ्यांचा उगम अज्ञाताच्या शोधार्थ निघालेल्या जिज्ञासूच्या विशेष जिज्ञासेत आहे असे दिसून येते. अज्ञाताची दालने उघडून त्यांच्या दर्शनाने नवनवे उन्मेष, धुमारे, आमोद व नित्योत्सवांनी जीवनाची महापर्वे फुलावीत ही स्वाभाविक इच्छा त्याला असणारच. ह्या अनाहूत ओढीचे स्वरूप त्याच्या आकलनात आले नसले तरी त्याचा प्रवास मात्र एका विशिष्ट दिशेनेच होत असतो. साधारणपणे बालपणापासून समज वाढत असता आपल्या अत्यंत आवडीच्या विषयाभोवती त्याचे मन पिंगा घालीत असते. त्या व्यतिरिक्त त्यास उपलब्ध असलेल्या अन्य शक्तिंचे संगठन करून त्याचा विनियोग बऱ्याच प्रमाणात आवडीच्या विषयप्राप्तीप्रीत्यर्थ करीत असतो. ह्या साऱ्या वाटचालीचे एका संकलित वृत्तीत रूपांतर होत असते.''
न्यायरत्न म्हणतात, “अनेकदा बौद्धिक किंवा वैचारिक परिवर्तन होत असते. परंतु त्याचा परिणाम मात्र हृदयापर्यंत पोहोचतोच असे नाही. असे प्रसंग क्वचितच घडतात. हृदयपरिवर्तन ही एक महान प्रक्रिया आहे.’’
No comments:
Post a Comment