श्रीमद्भगवद्गीता : दुसरा अध्याय (सांख्ययोग)
मूळ दुसऱ्या अध्यायाचा प्रारंभ
अथ द्वितीयोऽध्यायः
अर्थ
दुसरा अध्याय सुरु होतो.
गीताई
संजय म्हणाला
असा तो करुणा-ग्रस्त घाबरा अश्रु गाळित ।
करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला ॥ १ ॥
मूळ श्लोक
सञ्जय उवाच
तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ २-१ ॥
संदर्भित अन्वयार्थ
सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, तथा = तशाप्रकारे, कृपया = करुणेने, आविष्टम् = व्याप्त, अश्रुपूर्णाकुलेक्षणम् = ज्याचे डोळे अश्रूंनी युक्त व व्याकूळ झालेले आहेत, (च) = आणि, विषीदन्तम् = शोकयुक्त (अशा), तम् = त्या(अर्जुना)ला, मधुसूदनः = भगवान मधुसूदन, इदम् = हे, वाक्यम् = वचन, उवाच = म्हणाले ॥ २-१ ॥
अर्थ
संजय म्हणाले, अशा रीतीने करुणेने व्याप्त, ज्याचे डोळे आसवांनी भरलेले व व्याकूळ दिसत आहेत, अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले. ॥ २-१ ॥
Sanjaya said: Seeing Arjuna full of compassion and very sorrowful, his eyes brimming with tears, Madhusudana, Krsna, spoke the following words.
वामनपंडितांची गीतार्थबोधिनी
समश्लोकी
कृपाविष्ट तसा पार्थ आशीं नेत्रांत दाटली
बोले विषादयुक्तातें त्यातें हें मधुसूदन ॥
आर्या
संजय म्हणे किरीटी साश्रुसखेदहि बहूकृपावंत
होतां मधुसूदन तो बोले वचनें तयासि भगवंत ॥
दोहा
लेऊ सास असुवाभरें अर्जुन करुणाभाय
बहुबिखादसों जुगत लखी बोले श्री जदुराय ॥
ओवी
संजय म्हणे धृतराष्ट्रातें । अर्जुन वेष्टिला मोहें बहुतें ।
अश्रुपात आलें नेत्रांतें । देखोनि बोलिला श्रीकृष्ण ॥
अभंग
श्री गुरुव्यासाचा । शिष्य सद्विद्येचा । धृतराष्ट्रदेवाचा । –तोषदानी ॥1॥
बोले राया देव । उघड अपूर्व । तरी हें वैभव । भोक्ता होसी ॥2॥
कृपेनें व्यापीला । सांडित अश्रूला । येथें पार्थ भ्याला । विषादानें ॥3॥
मग मधुरिपू । शांतवी अमूपू । शांतवावें वपू । तुका म्हणे ॥4॥
श्री दीनानाथ भार्गव 'दिनेश' कृत श्रीहरिगीता
संजय ने कहा - ऐसे कृपायुत अश्रुपूरित दुःख से दहते हुए । कौन्तेय से इस भांति मधुसूदन वचन कहते हुए ॥ २ । १ ॥
ज्ञानेश्वरीतील ओव्या -
मग संजयो म्हणे रायातें । आइकें तो पार्थु तेथें । शोकाकुल रुदनातें । करितुसे ॥ १॥
तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद्भुत । तेणें द्रवले असे चित्त । कवणेपरी ॥ २ ॥
जैसें लवण जळें झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले । तैसे सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ॥ ३॥
म्हणोनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला । जैसा कर्दमीं रुपला । राजहंस ॥ ४ ॥
तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अतिजर्जरु । देखोनि । शार्गङधरु । काय बोले ॥ ५ ॥
वामनपंडितांच्या यथार्थदीपिकेतील एक ओवी अशी आहे -
हा "न करी म्हणे कदन" । परी सारथी केला मधुसूदन ।
मधुमुरनरककैटभमर्दन । तो का सोडितो?
स्वामी स्वरूपानंदांची अभंग ज्ञानेश्वरी-
मग रायालागीं । म्हणे तो संजय । पुढें झालें काय । ऐकें आतां ॥१॥
रणांगणीं पार्थ । ऐशापरी खिन्न । होवोनि रुदन । करुं लागे ॥२॥
उपजला चित्तीं । मोह विलक्षण । सर्व आप्तजन । देखोनियां ॥३॥
तेणें त्याचें चित्त । द्रवोनियां गेलें । जलें पाझरलें । जैसें मीठ ॥४॥
हृदय सधीर । परी विरमलें । वातें झळंबलें । अभ्र जैसें ॥५॥
किंवा राजहंस । कर्दमीं रुतावा । मग तो दिसावा । म्लान -मुख ॥६॥
तैसा दिसे पार्थ । अति कोमेजला । कारुण्यें व्यापिला । म्हणोनियां ॥७॥
देखोनि तो ऐसा । महा -मोहें ग्रस्त । तयासी श्रीकांत । काय बोले ॥८॥
टिपण :
अर्जुनाची जशी अवस्था झालेली आहे तशी अवस्था सामान्य प्रापंचिक माणसाची अनेकदा होते. मोहप्रसंगी माणसाने कसे वागावे हे अर्जुनाला उपदेश करण्याच्या मिषाने सांगण्याचा गीताकारांचा उद्देश आहे.
एखादा शब्द अडला की आपण तो कोशात बघतो. त्याचप्रमाणे जीवनात काही अडचण आली तर गीतेचा संदर्भ घ्यावा असे गांधीजी म्हणत असत व ह्याच अर्थाने त्यांनी गीतेला धर्मकोश असे म्हटले आहे.
भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद ह्यांनी वरील श्लोकातील मधुसूदन हा शब्द महत्त्वाचा आहे असे म्हटले आहे. मधु (मोहरूपी) दैत्याचा नाश करणारा असे कृष्णाचे नाव गीताकारांनी येथे योजिले आहे हे सूचक आहे.
श्री. कुंदर दिवाण ह्यांच्या विष्णुसहस्रनामचिंतनिकेमध्ये मधुसूदन ह्या नावावरील चिंतनात असाच अर्थ दिलेला आहे. भगवंतांची नामे `गौणानि' आणि `विख्यातानि' अशी आहेत आणि मधुसूदन ह्या नावातील मधु हा दैत्य कोणाचा मुलगा किंवा कोणाचा कोण होता ह्यापेक्षा त्याचा मोहरूप, कामरूप दैत्य असा `गौण' (गुणवाचक) अर्थ घ्यायला हवा असे ते म्हणतात.
अर्जुन ज्या करुणेने ग्रस्त झालेला आहे ती करुणा सात्त्विक नाही असे प्रतिपादन श्री. बाळकोबा भावे ह्यांनी आपल्या गीता तत्त्वबोध ह्या ग्रंथामध्ये केलेले आहे. सात्त्विक करुणेने भारलेल्या माणसाला मानसिक अस्वस्थता सतावत नाही. ह्या उलट अर्जुन अस्वस्थ झालेला आहे त्यामुळे त्याच्या करुणेचे मूळ मोहात आहे असे त्यांनी म्हटले आहे. स्वामी चिन्मयानंदांनी अर्जुनाची ही despondency म्हणजे ''tearless weeping is a climax of hysterical attack'' असे म्हटले आहे. बाळकोबांप्रमाणेच त्यांनीही ह्या भावनेला 'misplaced pity' असे नाव दिलेले आहे.
पांडुरंगशास्त्री आठवले आपल्या गीतामृतम् ह्या ग्रंथात अर्जुनाला झालेल्या विषादाची जातकुळी `योगा'ची आहे हे निदर्शनास आणून देतात. इतका उत्कट विषाद माणसाला वैराग्य आणतो, भक्तिची कास धरण्यास आणि सत्यज्ञान संपादन करण्यास उद्युक्त करतो म्हणून तो `विषादयोग' होय. `जो त्रिविधतापे पोळला । तोचि अधिकारी योग्य झाला । परमार्थासी ।।' हे दासवचनही `विषादयोग' हा एक प्रकारचा 'अधिकारयोग' असल्याचे सूचित करते.
ह्याच दिशेने डॉ. रवीन थत्ते ह्यांनी The Genius of Dnyneshwar ह्या आपल्या ग्रंथातील 24 व्या प्रकरणात ह्याचा ऊहापोह केलेला आहे. नित्शेज् ओव्हरमॅन, एब अँड टाईड असे त्याचे शीर्षक आहे. पुनरुज्जीवन प्राप्त होण्यापूर्वीच्या नैराश्याच्या, विषादाच्या आणि आत्मक्लेशाच्या भरती ओहोटीच्या लाटांमधून ह्या ओव्हरमॅनला जावे लागते आणि नंतर योग्य वेळी त्याला पुनरुज्जीवन प्राप्त होते. ही संकल्पना त्यांना अर्जुनाच्या झळंबणार्या हृदयाशी नाते सांगणारी वाटते. ''His very salt gone to water...'' असे ज्ञानेश्वरांच्या ओवीचे सुंदर भाषांतर त्यांनी केले आहे.
God Talks With Arjuna ह्या गीतेवरील ग्रंथामध्ये श्री श्री परमहंस योगानंद ह्यांनी गीता हा मानवाच्या आध्यात्मिक प्रवासाचा मार्गक्रम असल्याचा विचार मांडलेला आहे. ह्या श्लोकात वर्णिलेली अर्जुनाची अवस्था ह्या मार्गावर प्रवास सुरू करणार्या पांथस्थाची प्रारंभिक अवस्था आहे असे ते म्हणतात. ह्या अवस्थेत लौकिकामध्ये आसक्ती उरलेली नसते पण अलौकिकाची आसही लागलेली नसते. इंद्रियसुख किंवा ध्यानधारणा ह्या दोहोंचाही आनंद त्याला घेता येत नाही. म्हणून साधक किंकर्तव्यमूढ झालेला असतो.
No comments:
Post a Comment