गीताई
श्री भगवान् म्हणाले
कोठूनि भलत्या वेळी सुचले पाप हे तुज ।
असे रुचे न थोरांस ह्याने दुष्कीर्ति दुर्गति ॥ २ ॥
मूळ श्लोक
श्रीभगवानुवाच
कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् ।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥ २-२ ॥
संदर्भित अन्वयार्थ
श्रीभगवान = श्रीभगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, अर्जुन = हे अर्जुना, विषमे = अयोग्य वेळी, इदम् = हा, कश्मलम् = मोह, कुतः = कोणत्या कारणाने, त्वा समुपस्थितम् = तुला झाला, (यतः) = कारण, अनार्यजुष्टम् = हा श्रेष्ठ पुरुषांकडून आचरलेला नव्हे, अस्वर्ग्यम् = स्वर्ग प्राप्त करून देणारा नव्हे, (च) = आणि, अकीर्तिकरम् = कीर्ति देणारा पण नव्हे ॥ २-२ ॥
अर्थ
श्रीभगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? कारण हा थोरांनी न आचरलेला, स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही. ॥ २-२ ॥
The Supreme Person [Bhagavan] said: My dear Arjuna, how have these impurities come upon you? They are not at all befitting a man who knows the progressive values of life. They do not lead to higher planets, but to infamy.
वामनपंडितांची गीतार्थबोधिनी
समश्लोकी
कैचें कश्मल हें तूज उदेले विषमांत या
ज्याणें अकिर्तिनरक तुज योग्य न अर्जुना ॥
आर्या
ऐशा विषमावसरीं आर्यपथस्वर्गकीर्ति लोटून
पार्था नीचाश्रित हें आलें कश्मल तुलाच कोठून ॥
दोहा
अर्जुन यो संग्राम में कित दुख पायो मीत
कीरत और स्वर्गही हरे काहे भयभीत ॥
ओवी
अर्जुना कश्मल कोठूनी । उदेलें विषमकाळीं मनीं ।
हें स्वर्गातें नासूनी अपकीर्तितें देईल ॥
अभंग
बोले भगवान । योग्या जो निधान । कसें कश्मलपण । तुज आलें ॥1॥
उदेलें विषमीं । न लागे सत्कर्मीं । जेणें राहावें धामीं । अकीर्तीच्या ॥2॥
जोडी नरकासी । हें दिसे आम्हांसी । त्यागीं बुद्धी ऐसी । तुका म्हणे ॥3॥
श्री दीनानाथ भार्गव 'दिनेश' कृत श्रीहरिगीता
श्रीभगवान् ने कहा - -
अर्जुन! तुम्हें संकट- समय में क्यों हुआ अज्ञान है ।
यह आर्य- अनुचित और नाशक स्वर्ग, सुख, सम्मान है ॥ २ । २ ॥
ज्ञानेश्वरीतील ओव्या -
म्हणे अर्जुना आदि पाहीं । हें उचित काय इये ठायीं ।
तूं कवण हें कायी । करीत आहासी ॥ ६ ॥
तुज सांगे काय जाहलें । कवण उणें आलें ।
करितां काय ठेलें । खेदु कायिसा ॥ ७ ॥
तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कंहीच न संडिसी ।
तुझेनि नामे अपयशीं । दिशा लंघिजे ॥ ८ ॥
तू शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो ।
तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं ॥ ९ ॥
तुवा संग्रामीं हरु जिंतिला । निवात्कवचांचा ठावो फेडिला ।
पवाडा तुवां केला । गंधर्वासी ॥ १० ॥
हें पाहता तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें ।
ऐसें पौरुष चोखडें । पार्था तुझे ॥ ११ ॥
तो तूं कीं आजि एथें । सांडुनिया वीरवृत्तीतें ।
अधोमुख रुदनातें । करितु आहासी ॥ १२ ॥
विचारीं तूं अर्जुनु । कीं कारुण्यें कीजसी दीनु ।
सांग पां अंधकारे । भानु ग्रासिला आथी ॥ १३ ॥
ना तरी पवनु मेघासी बिहे । कीं अमृतासी मरण आहे ।
पाहे पा इंधनचि गिळोनि जाये । पावकातें ॥ १४ ॥
की लवणेंचि जळ विरे । संसर्गें काळकूट मरे ।
सांग महाफणी दर्दुरें । गिळिजे कायी ॥ १५ ॥
सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथी कां जाहला ।
परी तो त्वां साच केला । आजि एथ ॥ १६ ॥
म्हणोनि अझुनि अर्जुना । झणें चित्त देसी या हीना ।
वेगीं धीर करूनियां मना । सावधान होईं ॥ १७ ॥
सांडी हे मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण ।
संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझे ॥ १८ ॥
हां गा तू जाणता । तरी न विचारीसी कां आता ।
सांगे झुंजावेळें सदयता । उचित कायी ॥ १९ ॥
हे असतिये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु ।
म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ॥ २० ॥
वामनपंडितांच्या यथार्थदीपिकेतील ओव्या -
पूर्ण षड्गुणवैभव । तो भगवान् देवदेव । म्हणे, "कोण्या हेतूस्तव । मूढत्व उपजलें हें तूतें? ॥11॥ कारणें वदसी बहुतें । तीं पोंचट अवघीं निमित्तें । हें तूं मानिसी मूढचित्तें । करूनिया ॥12॥ युद्धारंभ विषम काळ । ये समयीं हा फटकाळ । मोह उपजला तो तात्काळ । नाशी सकळ कल्याणें ॥13॥ इहलोकीं अपकीर्ति । स्वर्गहानि नरकप्राप्ति । जे भले ते हें चित्तीं । न धरिती कदापि ॥14॥ हे गोष्टी तुच्छांस योग्य । अपकीर्तिकर अस्वर्ग्य । तुज ऐसे चतुर सभाग्य। मनीं ऐसे न धरिती "॥
स्वामी स्वरूपानंदांची अभंग ज्ञानेश्वरी-
म्हणे पार्था आधीं । करी तूं विचार । येथें हा आचार । योग्य काय ॥९॥
कोण तूं गा काय । करिसी हें येथें । काय झालें तूतें । सांगें मज ॥१०॥
कशासाठीं खेद । तुज उणे काई । करुं जातां कांहीं । राहिलें का ? ॥११॥
न देसी तूं चित्त । अयोग्य गोष्टीसी । धीर ना सोडिसी । कदा काळीं ॥१२॥
नाम तुझें मात्र । ऐकोनि साचार । होतें दिशापार । अपयश ॥१३॥
शौर्याचा तूं ठाव । क्षत्रियांत राव । युद्धीं तुझें नांव । तिन्हीं लोकीं ॥१४॥
निवात -कवच । मारिलें असुर । जिंकिला शंकर । संग्रामीं तूं ॥१५॥
झाले तुजपुढें । गंधर्व बापुडे । पौरुष चोखडें । ऐसें तुझें ॥१६॥
काय सांगूं तुझ्या । प्रभावाचें मान । त्रैलोक्य हि सान । वाटतसे ॥१७॥
तो तूं आज येथें । सांडोनियां शौर्य । रडतोसी काय । अधोमुख ॥१८॥
पाहें तूं अर्जुन । तुज आकळून । करावें का दीन । कारुण्यानें ? ॥१९॥
सूर्यातें अंधार । ग्रार्सील का वीरा । भिईल का वारा । मेघालागीं ॥२०॥
किंवा अमृतासी । आहे का मरण । अग्नीतें सर्पण । गिळी काय ? ॥२१॥
संसर्गाची बाधा । होवोनि मरेल । काय हालाहल । सांगें मज ॥२२॥
किंवा मिठानें का । पाणी पाझरेल । बेडूक गिळील । भुजंगासी ॥२३॥
सिंहाशी जंबूक । कैसा झगडेल । ऐसें का घडेल । अघटित ॥२४॥
अघटितासी ह्या । परी साचपणा । आज तूं अर्जुना । आणिलासी ! ॥२५॥
पार्था , अजूनी हि । धरोनियां धीर । तोडीं हा सत्वर । मोह -पाश ॥२६॥
होई सावधान । सांडीं मूर्खपण । ऊठ चाप -बाण । सज्ज करीं ॥२७॥
नको नको ऐसें । रणीं हें कारुण्य । आहेस तूं सुज्ञ । धनुर्धरा ॥२८॥
करोनि विचार । सांगें धनंजया । संग्रामीं ही दया । योग्य काय ॥२९॥
येणें इहलोकीं । तुझा दुर्लौकिक । आणि परलोक । अंतरेल ॥३०॥
दुःख आणि पाप ह्या दोन संकल्पनांची तर्कशुद्ध मीमांसा करणा-या गीतेने प्रारंभीच 'कश्मलं' असा अर्थगर्भ शब्द योजिलेला आहे.
No comments:
Post a Comment