Saturday, August 12, 2017

Bhagavad Gita 2-3 भगवद्गीता – क्षुद्र हृदयदौर्बल्य

श्रीमद्‌भगवद्‌गीता : दुसरा अध्याय (सांख्ययोग), श्लोक 3

गीताई

निर्वीर्य तू नको होऊ न शोभे हे मुळी  तुज ।
भिकार दुबळी वृत्ति सोडुनी ऊठ तू कसा ॥ ३ ॥

मूळ श्लोक

क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥ २-३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

(अतः) = म्हणून, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथपुत्र अर्जुना), क्लैब्यं = नपुंसकपणा, मा स्म गमः = पत्करू नकोस, एतत्‌ = हे, त्वयि = तुला, न उपपद्यते = योग्य नाही, परन्तप = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना), क्षुद्रम्‌ हृदयदौर्बल्यम्‌ = हृदयाचा तुच्छ दुर्बळपणा, त्यक्त्वा = सोडून देऊन, उत्तिष्ठ = युद्धाला उभा ठाक ॥ २-३ ॥

अर्थ

म्हणून हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), षंढपणा पत्करू नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा. ॥ २-३ ॥

TRANSLATION

O son of Prtha, do not yield to this degrading impotence. It does not become you. Give up such petty weakness of heart and arise, O chastiser of the enemy.

वामनपंडितांची गीतार्थबोधिनी

समश्लोकी

पार्था षंढ नको होऊं तुज योग्यचि हें नव्हे

ऊठ टाकूनियां लंडीपण परंतपा  

आर्या

उचित क्लीबत्व नव्हे निज शौर्याची नको करू तूट ।

क्षुद्रमनोदौर्बल्या त्यजुनि पार्था परंतपा ऊठ ।।          

दोहा

नपुंसकता कबहू न करें । यह तोको नहि जोग ।।

छांड कटारी हृदयकी । दे शत्रुनकों रोग ।।


ओवी

नपुंसकपण न धरी मनीं । तुज योग्य नव्हे जाणूनी । क्षुद्र टाकीं हृदयींहुनी । ऊठ त्वरित युद्धासी ।।

अभंग

पार्था षंढ होणें । नको लाजिरवाणें । तुज पूर्णपणें । बाधक जें ।।1।।

द्वाड हे कल्पना । तूज हे साजेना । तुच्छ त्यागी रणा । – लागी ऊठ ।। 2।।

लंडीपण परंतपा । हें त्यागी पां । मार्ग धरी सोपा । वडिलांचा ।।3।।

श्री दीनानाथ भार्गव 'दिनेश' कृत श्रीहरिगीता

अनुचित नपुंसकता तुम्हें हे पार्थ! इसमें मत पड़ो ।
यह क्षुद्र कायरता परंतप! छोड़ कर आगे बढ़ो ॥ २ । ३ ॥

ज्ञानेश्वरीतील ओव्या -

म्हणोनि शोक न करीं । तूं पुरता धीरु धरीं । हे शोच्यता अव्हेरीं । पंडुकुमरा ॥ २१ ॥

तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडले बहुत । तूं अझुनिवरी हित । विचारी पां ॥ २२ ॥

येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळुपण नुपकरे । हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज ॥ २३ ॥

तूं आधींचि काय नेणसी । कीं गोत्र नोळखसी । वायांचि काय करिसी । अतिशो आतां ॥ २४ ॥

आजिंचे हें काय झुंज । काय जन्मा नवल तुज । हें परस्परें तुम्हां व्याज । सदाचि आथि ॥ २५ ॥

तरी आतां काय जाहलें । कायि स्नेह उपनले । हें नेणिजे परि कुडे केले । अर्जुना तुवा ॥ २६ ॥

मोह धरिलिया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल । आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेंसी ॥ २७ ॥

हृदयाचे ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण । हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रीयांसी ॥ २८ ॥

ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु । हे ऐकोनि पंडुसुतु । काय बोले ॥ २९ ॥

वामनपंडितांच्या यथार्थदीपिकेतील ओव्या -

पूर्ण षड्गुणवैभव । तो भगवान्‌ देवोदेव । म्हणे, 'कोण्या हेतूस्तव । मूढत्व उपजलें हें तूतें? ।।11।। कारणें वदसी बहुतें । तीं पोंचट अवघी निमित्तें । हें तूं मानिसी मूधचित्तें । करूनिया ।।12।। युद्धारंभ विषम काळ । ये समयीं हा फटकाळ । मोह उपजला तो तात्काळ । नाशी सकळ कल्याणें ।।13।। इहलोकीं अपकीर्ति । स्वर्गहानि नरकप्राप्ति । जे भले ते हें चित्तीं । न धरिती कदापि ।।14।। हे गोष्टी तुच्छांस योग्य । अपकीर्तिकर अस्वर्ग्य । तुज ऐसे चतुर सभाग्य । मनीं ऐसें न धरिती' ।।15।। मुरडावया मत्त जस्ती । महामात्र दोन्हीं हस्तीं । अंकुश हाणी, तैसा श्रीपती । मर्मोद्धाटनें करीतसे ।।16।। `नको धरू षंढपणा । नको स्मरूं पूर्वगुणा । विराटनगरीं आपणा । षंढ म्हणविले जैसें ।।17।। तोचि संस्कार तुजला । आजि वाटतो उदेला, । परी हा विचार न भला । नको होऊं नपुंसक ।।18।। म्हणसी `न भाडे आपण' । याहूनिकाय लंडीपण । हा तों नपुंसका गुण । नव्हे तुज योग्य' ।।19।। या प्रसंगी म्हणे पार्था । पार्थनामी गहन अर्था । दावीत या भावार्था । पूर्वाध्यायीं वर्णिलें ।। 20।। पृथा कुंती तिचा सुत । तो पार्थ गूढार्थ यांत। कीं कोमळ हा निश्चित । मायाळू गुण स्त्रियांचा ।।21।। मातेचे दयाळूपण । अवलंबिसी आपण । परी तुझ्या ठायी हा गुण । योग्य नव्हे ।। 22।। झाला असतास कन्या । तरी लोक म्हणते काय धन्या । पुत्र होउनि या दैन्या । काय भाकिसी? ।।23।। पृथा नव्हे सामान्या । ते आम्हां यादवांची कन्या । तिचा पुत्र होउनि दैन्या । काय भाकिसी? ।।24।। इत्यादि भावविवरण । असो याकारणें म्हणे श्रीकृष्ण । तुज योग्य नव्हे हें लंडीपण । अगा पार्था! ।।25।। आणि भ्यालाही अससी । ऐसें वाटतें मानसीं । बहुतेक विसरलासी । सामर्थ्य आपुलें ।।26।। हें क्षुद्र दुर्बळपण । हा मनाचा सहज गुण । तूं साच मानिसी आपण । परम समर्थ होउनि ।।27।। मनाचे दुर्बलत्व । काय साच मानिसी तत्त्व?। ऊठ अवलंबूनि सत्त्व । परंतपा ! ।।28।। तूं पराक्रमी ह्या भावें । `परंतपा' ऐशा नांवें । तिखारितों1 कीं तूं स्वभावें। परंतप ।।29।। पर जे शत्रु त्यांस ताप । करी ऐसा तुझा प्रताप । मनाच्या दुर्बलत्वें पाप । स्वजनहत्या म्हणतोसी. ।।30।। हें बोलिला उत्तमश्लोक । याचें उत्तर उत्तरश्लोक । आधींच पार्थ सशोक । दुःखी झाला बहु फार. ।।31।। घाय लागोनि जर्जर । रणीं पडला ज्जो नर । त्यास करिजे लत्ताप्रहर । तैसे अर्जुना हे शब्द ।।32।। हा समजोनी भावार्थ । क्रोधे संतप्त जाला पार्थ । तडफडोनि पूर्वोक्त् अर्थ । सिद्ध करतो अर्जुन ।।33।।

स्वामी स्वरूपानंदांची अभंग ज्ञानेश्वरी-

तरी नको शोक । पुरा धरीं धीर । पार्थासी श्रीधर । ऐसें बोले ॥३१॥

आप्तांसाठीं खेद । करावा रणांत । नव्हे हें उचित । तुजलागीं ॥३२॥

लोपेल तें येणें । जोडलें बहुत । आतां तरी हित । विचारीं गा ॥३३॥

हें तों रणांगण । पार्था घेई चित्तीं । येथें दया -वृत्ति । कामा नये ॥३४॥

आतां चि हे काय । सोयरे दिसावे । नव्हतें का ठावें । आधीं तुज ॥३५॥

काय नव्हतासी । ओळखीत ह्यांसी । वायां कां करिसी । अतिरेक ॥३६॥

जन्मोनियां तुज । युद्धाचा प्रसंग । आतां चि का सांग । आला येथें ॥३७॥

तुम्हां एकमेकां । युद्धाचें निमित्त । असे सदोदित । धनंजया ॥३८॥

तरी नेणों तुज । आतां काय झालें । कैसें उपजलें । कारुण्य हें ॥३९॥

परी पार्था हें तों । कृत्य अनुचित । ऐसें चि निश्चित । वाटे मज ॥४०॥

गुंततां मोहांत । ऐशापरी देख । लाभला लौकिक । दुरावेल ॥४१॥

इह -परलोक । दोन्ही अंतरोनि । होईल निदानीं । अकल्याण ॥४२॥

युद्धीं हृदयाचें । ऐसें ढिलेपण । अधःपात जाण । क्षत्रियांसी ॥४३॥

नाना परी ऐसें । प्रभु कृपावंत । असे शिकवीत । पार्थालागीं ॥४४॥

ऐकोनि हे बोल । पार्थ काय म्हणे । इतुकें बोलणें । नको देवा ॥४५॥

टिपण :

No comments: