Sunday, November 12, 2017

जीवन आणि मृत्यु

गुरुवर्य कै. र. गो. बोडस ह्यांच्या लेखनवहीतून---

जीवन आणि मृत्यु ही विरोधी सत्य आहेत मग जीवनाची पूर्णना मृत्यु झाल्यावर कशी होईल? मृत्यु हा जीवनाचा अंत नसून जन्माचा अन्त आहे, आणि तो सरतेशेवटी येतो म्हणून आपण मृत्यु देहान्तात येतो असे समजता कामा नये. जन्मामध्येच मृत्यु उपस्थित आहे.

जन्मलेल्या दिवसापासूनच मृत्यु येत असतो जन्मानंतर आपण प्रतिक्षणाला मरत असतो. ही मरणप्रक्रिया ज्या दिवशी पूर्ण होते त्याला आपण मृत्यु म्हणतो. जन्मामध्ये तो बीजरूपाने असतो तर शेवटी तो पूर्णरूपात प्रकट होतो. म्हणून जन्मानंतरचे काहीही निश्चित नाही पण मृत्यु मात्र अवश्य आहे. ह्याचे कारण त्याचे आगमन जन्माबरोबरच झालेले असते.

जातस्य हि ध्रुवो मृत्यु: । जन्म हे त्याचे दुसरे नाव आहे, त्याचेच बीजरूप आहे. ज्या दिवशी आपण जन्मतो तेव्हापासूनच निरंतर मरत आहोत. ज्याला आपण जीवन म्हणून जाणतो ते जीवन नाही तर क्रमाने आणि धीमी अशी ती मृत्यूची प्रक्रिया आहे.

जीवनाच्या ऐवजी मृत्युशीच आपण जास्त परिचित असतो म्हणून पूर्णवेळ त्याच्यापासून बचाव करण्यात घालवतो. आमची सारी योजना सुरक्षिततेसाठी आणि आत्मरक्षणासाठीच असते. मृत्युच्या निकटतेमुळे मानव धार्मिक वृत्तीचा बनतो. वृद्धावस्थेत ही धार्मिकता वाढीस लागते परंतु ही धार्मिक नसून मृत्यु-भयाचे एक रूप आहे, सुरक्षेचा एक अन्तिम उपाय आहे.

वास्तविक धार्मिकता ही मृत्युभयातून निर्माण होत नाही तर ती जीवनानुभवातून जन्माला येते.

शरीर प्रतिक्षणाला मरत असते. विनाशधर्म असलेल्या देहाविषयी आपण विशेष जागरूक असल्याने मृत्यूचाच अनुभव आपण करीत असतो.

जीवन जाणून घेतले पाहिजे कारण त्याचा जन्म झालेला नाही व म्हणून त्याला मृत्युही नाही. हे सत्य जन्मापूर्वी तसेच मृत्योनंतरही असतेच. जीवन जन्म आणि मृत्यू ह्यांच्यामध्ये नसून जन्म आणि मृत्यू ह्या घटना त्यामध्ये घडतात.

ध्यानावस्थेत चित्त शून्य आणि शांत होते तेव्हा देहाहून भिन्न भिन्न तत्त्वांचे दर्शन होते. चित्ताच्या अशांतीमुळे त्यांचे दर्शन घडणार नाही.

शरीर हा केवळ माझा निवास आहे. सरे काही माझेच अशी प्रतीति येऊ लागते, माझी सत्ता आणि माझे जीवन असा भ्रम निर्माण होतो. माझ्या जीवनाची इतिश्री मी देहापुरतीच मानू लागतो. हा देहाभास, हे देहतादात्म्य जीवनाच्या वास्तव दर्शनाच्या आड येते आणि क्षणाक्षणाला जीवन घटत जाणार्‌या देहाच्या क्रमिक मृत्युलाच जीवन समजतो. अंधःकाराचे तरंग जाऊन चित्त निस्तरंग होईल तेव्हा प्रथमच आपल्या देहात निवास करणार्‌याशी आपली ओळख होते.

देहाभिमानी मनुष्याच्या जीवनाला कधीच प्रारंभ होत नाही कारण तो एका स्वप्नात, निद्रेत अथवा मूर्च्छेत असतो. या मूर्च्छेतून जागृती आल्याशिवाय स्वतःच तो त्याची सत्ता, आधार आणि जीवन आहे याचा त्याला बोध होत नाही. अशी जिवंत मृत माणसे मृत्यूपासून आपले रक्षण करण्यासाठी धडपडत असतात व म्हणून त्यांच्यामध्ये असलेल्या अमृतत्वाला - ज्याचा कधी मृत्यू नाही - ते जाणत नाहीत.

Saturday, August 12, 2017

Bhagavad Gita 2-3 भगवद्गीता – क्षुद्र हृदयदौर्बल्य

श्रीमद्‌भगवद्‌गीता : दुसरा अध्याय (सांख्ययोग), श्लोक 3

गीताई

निर्वीर्य तू नको होऊ न शोभे हे मुळी  तुज ।
भिकार दुबळी वृत्ति सोडुनी ऊठ तू कसा ॥ ३ ॥

मूळ श्लोक

क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥ २-३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

(अतः) = म्हणून, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथपुत्र अर्जुना), क्लैब्यं = नपुंसकपणा, मा स्म गमः = पत्करू नकोस, एतत्‌ = हे, त्वयि = तुला, न उपपद्यते = योग्य नाही, परन्तप = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना), क्षुद्रम्‌ हृदयदौर्बल्यम्‌ = हृदयाचा तुच्छ दुर्बळपणा, त्यक्त्वा = सोडून देऊन, उत्तिष्ठ = युद्धाला उभा ठाक ॥ २-३ ॥

अर्थ

म्हणून हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), षंढपणा पत्करू नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा. ॥ २-३ ॥

TRANSLATION

O son of Prtha, do not yield to this degrading impotence. It does not become you. Give up such petty weakness of heart and arise, O chastiser of the enemy.

वामनपंडितांची गीतार्थबोधिनी

समश्लोकी

पार्था षंढ नको होऊं तुज योग्यचि हें नव्हे

ऊठ टाकूनियां लंडीपण परंतपा  

आर्या

उचित क्लीबत्व नव्हे निज शौर्याची नको करू तूट ।

क्षुद्रमनोदौर्बल्या त्यजुनि पार्था परंतपा ऊठ ।।          

दोहा

नपुंसकता कबहू न करें । यह तोको नहि जोग ।।

छांड कटारी हृदयकी । दे शत्रुनकों रोग ।।


ओवी

नपुंसकपण न धरी मनीं । तुज योग्य नव्हे जाणूनी । क्षुद्र टाकीं हृदयींहुनी । ऊठ त्वरित युद्धासी ।।

अभंग

पार्था षंढ होणें । नको लाजिरवाणें । तुज पूर्णपणें । बाधक जें ।।1।।

द्वाड हे कल्पना । तूज हे साजेना । तुच्छ त्यागी रणा । – लागी ऊठ ।। 2।।

लंडीपण परंतपा । हें त्यागी पां । मार्ग धरी सोपा । वडिलांचा ।।3।।

श्री दीनानाथ भार्गव 'दिनेश' कृत श्रीहरिगीता

अनुचित नपुंसकता तुम्हें हे पार्थ! इसमें मत पड़ो ।
यह क्षुद्र कायरता परंतप! छोड़ कर आगे बढ़ो ॥ २ । ३ ॥

ज्ञानेश्वरीतील ओव्या -

म्हणोनि शोक न करीं । तूं पुरता धीरु धरीं । हे शोच्यता अव्हेरीं । पंडुकुमरा ॥ २१ ॥

तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडले बहुत । तूं अझुनिवरी हित । विचारी पां ॥ २२ ॥

येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळुपण नुपकरे । हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज ॥ २३ ॥

तूं आधींचि काय नेणसी । कीं गोत्र नोळखसी । वायांचि काय करिसी । अतिशो आतां ॥ २४ ॥

आजिंचे हें काय झुंज । काय जन्मा नवल तुज । हें परस्परें तुम्हां व्याज । सदाचि आथि ॥ २५ ॥

तरी आतां काय जाहलें । कायि स्नेह उपनले । हें नेणिजे परि कुडे केले । अर्जुना तुवा ॥ २६ ॥

मोह धरिलिया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल । आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेंसी ॥ २७ ॥

हृदयाचे ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण । हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रीयांसी ॥ २८ ॥

ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु । हे ऐकोनि पंडुसुतु । काय बोले ॥ २९ ॥

वामनपंडितांच्या यथार्थदीपिकेतील ओव्या -

पूर्ण षड्गुणवैभव । तो भगवान्‌ देवोदेव । म्हणे, 'कोण्या हेतूस्तव । मूढत्व उपजलें हें तूतें? ।।11।। कारणें वदसी बहुतें । तीं पोंचट अवघी निमित्तें । हें तूं मानिसी मूधचित्तें । करूनिया ।।12।। युद्धारंभ विषम काळ । ये समयीं हा फटकाळ । मोह उपजला तो तात्काळ । नाशी सकळ कल्याणें ।।13।। इहलोकीं अपकीर्ति । स्वर्गहानि नरकप्राप्ति । जे भले ते हें चित्तीं । न धरिती कदापि ।।14।। हे गोष्टी तुच्छांस योग्य । अपकीर्तिकर अस्वर्ग्य । तुज ऐसे चतुर सभाग्य । मनीं ऐसें न धरिती' ।।15।। मुरडावया मत्त जस्ती । महामात्र दोन्हीं हस्तीं । अंकुश हाणी, तैसा श्रीपती । मर्मोद्धाटनें करीतसे ।।16।। `नको धरू षंढपणा । नको स्मरूं पूर्वगुणा । विराटनगरीं आपणा । षंढ म्हणविले जैसें ।।17।। तोचि संस्कार तुजला । आजि वाटतो उदेला, । परी हा विचार न भला । नको होऊं नपुंसक ।।18।। म्हणसी `न भाडे आपण' । याहूनिकाय लंडीपण । हा तों नपुंसका गुण । नव्हे तुज योग्य' ।।19।। या प्रसंगी म्हणे पार्था । पार्थनामी गहन अर्था । दावीत या भावार्था । पूर्वाध्यायीं वर्णिलें ।। 20।। पृथा कुंती तिचा सुत । तो पार्थ गूढार्थ यांत। कीं कोमळ हा निश्चित । मायाळू गुण स्त्रियांचा ।।21।। मातेचे दयाळूपण । अवलंबिसी आपण । परी तुझ्या ठायी हा गुण । योग्य नव्हे ।। 22।। झाला असतास कन्या । तरी लोक म्हणते काय धन्या । पुत्र होउनि या दैन्या । काय भाकिसी? ।।23।। पृथा नव्हे सामान्या । ते आम्हां यादवांची कन्या । तिचा पुत्र होउनि दैन्या । काय भाकिसी? ।।24।। इत्यादि भावविवरण । असो याकारणें म्हणे श्रीकृष्ण । तुज योग्य नव्हे हें लंडीपण । अगा पार्था! ।।25।। आणि भ्यालाही अससी । ऐसें वाटतें मानसीं । बहुतेक विसरलासी । सामर्थ्य आपुलें ।।26।। हें क्षुद्र दुर्बळपण । हा मनाचा सहज गुण । तूं साच मानिसी आपण । परम समर्थ होउनि ।।27।। मनाचे दुर्बलत्व । काय साच मानिसी तत्त्व?। ऊठ अवलंबूनि सत्त्व । परंतपा ! ।।28।। तूं पराक्रमी ह्या भावें । `परंतपा' ऐशा नांवें । तिखारितों1 कीं तूं स्वभावें। परंतप ।।29।। पर जे शत्रु त्यांस ताप । करी ऐसा तुझा प्रताप । मनाच्या दुर्बलत्वें पाप । स्वजनहत्या म्हणतोसी. ।।30।। हें बोलिला उत्तमश्लोक । याचें उत्तर उत्तरश्लोक । आधींच पार्थ सशोक । दुःखी झाला बहु फार. ।।31।। घाय लागोनि जर्जर । रणीं पडला ज्जो नर । त्यास करिजे लत्ताप्रहर । तैसे अर्जुना हे शब्द ।।32।। हा समजोनी भावार्थ । क्रोधे संतप्त जाला पार्थ । तडफडोनि पूर्वोक्त् अर्थ । सिद्ध करतो अर्जुन ।।33।।

स्वामी स्वरूपानंदांची अभंग ज्ञानेश्वरी-

तरी नको शोक । पुरा धरीं धीर । पार्थासी श्रीधर । ऐसें बोले ॥३१॥

आप्तांसाठीं खेद । करावा रणांत । नव्हे हें उचित । तुजलागीं ॥३२॥

लोपेल तें येणें । जोडलें बहुत । आतां तरी हित । विचारीं गा ॥३३॥

हें तों रणांगण । पार्था घेई चित्तीं । येथें दया -वृत्ति । कामा नये ॥३४॥

आतां चि हे काय । सोयरे दिसावे । नव्हतें का ठावें । आधीं तुज ॥३५॥

काय नव्हतासी । ओळखीत ह्यांसी । वायां कां करिसी । अतिरेक ॥३६॥

जन्मोनियां तुज । युद्धाचा प्रसंग । आतां चि का सांग । आला येथें ॥३७॥

तुम्हां एकमेकां । युद्धाचें निमित्त । असे सदोदित । धनंजया ॥३८॥

तरी नेणों तुज । आतां काय झालें । कैसें उपजलें । कारुण्य हें ॥३९॥

परी पार्था हें तों । कृत्य अनुचित । ऐसें चि निश्चित । वाटे मज ॥४०॥

गुंततां मोहांत । ऐशापरी देख । लाभला लौकिक । दुरावेल ॥४१॥

इह -परलोक । दोन्ही अंतरोनि । होईल निदानीं । अकल्याण ॥४२॥

युद्धीं हृदयाचें । ऐसें ढिलेपण । अधःपात जाण । क्षत्रियांसी ॥४३॥

नाना परी ऐसें । प्रभु कृपावंत । असे शिकवीत । पार्थालागीं ॥४४॥

ऐकोनि हे बोल । पार्थ काय म्हणे । इतुकें बोलणें । नको देवा ॥४५॥

टिपण :

Thursday, April 6, 2017

Bhagavad Gita 2-2 भगवद्गीता - भलत्या वेळी सुचलेले पाप

श्रीमद्‌भगवद्‌गीता : दुसरा अध्याय (सांख्ययोग), श्लोक २

गीताई

श्री भगवान् म्हणाले
कोठूनि भलत्या वेळी सुचले पाप हे तुज ।
असे रुचे न थोरांस ह्याने दुष्कीर्ति दुर्गति ॥ २ ॥

मूळ श्लोक
 श्रीभगवानुवाच
   कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम्‌ ।
   अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥ २-२ ॥


संदर्भित अन्वयार्थ
श्रीभगवान = श्रीभगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, अर्जुन = हे अर्जुना, विषमे = अयोग्य वेळी, इदम्‌ = हा, कश्मलम्‌ = मोह, कुतः = कोणत्या कारणाने, त्वा समुपस्थितम्‌ = तुला झाला, (यतः) = कारण, अनार्यजुष्टम्‌ = हा श्रेष्ठ पुरुषांकडून आचरलेला नव्हे, अस्वर्ग्यम्‌ = स्वर्ग प्राप्त करून देणारा नव्हे, (च) = आणि, अकीर्तिकरम्‌ = कीर्ति देणारा पण नव्हे ॥ २-२ ॥

अर्थ
श्रीभगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? कारण हा थोरांनी न आचरलेला, स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही. ॥ २-२ ॥

TRANSLATION

The Supreme Person [Bhagavan] said: My dear Arjuna, how have these impurities come upon you? They are not at all befitting a man who knows the progressive values of life. They do not lead to higher planets, but to infamy.

वामनपंडितांची गीतार्थबोधिनी

समश्लोकी
कैचें कश्मल हें तूज उदेले विषमांत या
ज्याणें अकिर्तिनरक तुज योग्य न अर्जुना ॥
आर्या
ऐशा विषमावसरीं आर्यपथस्वर्गकीर्ति लोटून
पार्था नीचाश्रित हें आलें कश्मल तुलाच कोठून ॥
दोहा
अर्जुन यो संग्राम में कित दुख पायो मीत
कीरत और स्वर्गही हरे काहे भयभीत ॥
ओवी
अर्जुना कश्मल कोठूनी । उदेलें विषमकाळीं मनीं ।
हें स्वर्गातें नासूनी अपकीर्तितें देईल ॥
अभंग
बोले भगवान । योग्या जो निधान । कसें कश्मलपण । तुज आलें ॥1॥
उदेलें विषमीं । न लागे सत्कर्मीं । जेणें राहावें धामीं । अकीर्तीच्या ॥2॥
जोडी नरकासी । हें दिसे आम्हांसी । त्यागीं बुद्धी ऐसी । तुका म्हणे ॥3॥

श्री दीनानाथ भार्गव 'दिनेश' कृत श्रीहरिगीता

 
श्रीभगवान् ने कहा - - 
अर्जुन! तुम्हें संकट- समय में क्यों हुआ अज्ञान है ।
यह आर्य- अनुचित और नाशक स्वर्ग, सुख, सम्मान है ॥ २ । २ ॥

ज्ञानेश्वरीतील ओव्या -

म्हणे अर्जुना आदि पाहीं । हें उचित काय इये ठायीं ।
तूं कवण हें कायी । करीत आहासी ॥ ६ ॥
तुज सांगे काय जाहलें । कवण उणें आलें ।
करितां काय ठेलें । खेदु कायिसा ॥ ७ ॥
तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कंहीच न संडिसी ।
तुझेनि नामे अपयशीं । दिशा लंघिजे ॥ ८ ॥
तू शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो ।
तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं ॥ ९ ॥
तुवा संग्रामीं हरु जिंतिला । निवात्कवचांचा ठावो फेडिला ।
पवाडा तुवां केला । गंधर्वासी ॥ १० ॥
हें पाहता तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें ।
ऐसें पौरुष चोखडें । पार्था तुझे ॥ ११ ॥
तो तूं कीं आजि एथें । सांडुनिया वीरवृत्तीतें ।
अधोमुख रुदनातें । करितु आहासी ॥ १२ ॥
विचारीं तूं अर्जुनु । कीं कारुण्यें कीजसी दीनु ।
सांग पां अंधकारे । भानु ग्रासिला आथी ॥ १३ ॥
ना तरी पवनु मेघासी बिहे । कीं अमृतासी मरण आहे ।
पाहे पा इंधनचि गिळोनि जाये । पावकातें ॥ १४ ॥
की लवणेंचि जळ विरे । संसर्गें काळकूट मरे ।
सांग महाफणी दर्दुरें । गिळिजे कायी ॥ १५ ॥
सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथी कां जाहला ।
परी तो त्वां साच केला । आजि एथ ॥ १६ ॥
म्हणोनि अझुनि अर्जुना । झणें चित्त देसी या हीना ।
वेगीं धीर करूनियां मना । सावधान होईं ॥ १७ ॥
सांडी हे मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण ।
संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझे ॥ १८ ॥
हां गा तू जाणता । तरी न विचारीसी कां आता ।
सांगे झुंजावेळें सदयता । उचित कायी ॥ १९ ॥
हे असतिये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु ।
म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ॥ २० ॥

वामनपंडितांच्या यथार्थदीपिकेतील ओव्या -

पूर्ण षड्गुणवैभव । तो भगवान्‍ देवदेव । म्हणे, "कोण्या हेतूस्तव । मूढत्व उपजलें हें तूतें? ॥11॥ कारणें वदसी बहुतें । तीं पोंचट अवघीं निमित्तें । हें तूं मानिसी मूढचित्तें । करूनिया ॥12॥ युद्धारंभ विषम काळ । ये समयीं हा फटकाळ । मोह उपजला तो तात्काळ । नाशी सकळ कल्याणें ॥13॥ इहलोकीं अपकीर्ति । स्वर्गहानि नरकप्राप्ति । जे भले ते हें चित्तीं । न धरिती कदापि ॥14॥ हे गोष्टी तुच्छांस योग्य । अपकीर्तिकर अस्वर्ग्य । तुज ऐसे चतुर सभाग्य। मनीं ऐसे न धरिती "॥

स्वामी स्वरूपानंदांची अभंग ज्ञानेश्वरी-
 


म्हणे पार्था आधीं । करी तूं विचार । येथें हा आचार । योग्य काय ॥९॥
कोण तूं गा काय । करिसी हें येथें । काय झालें तूतें । सांगें मज ॥१०॥
कशासाठीं खेद । तुज उणे काई । करुं जातां कांहीं । राहिलें का ? ॥११॥
न देसी तूं चित्त । अयोग्य गोष्टीसी । धीर ना सोडिसी । कदा काळीं ॥१२॥
नाम तुझें मात्र । ऐकोनि साचार । होतें दिशापार । अपयश ॥१३॥
शौर्याचा तूं ठाव । क्षत्रियांत राव । युद्धीं तुझें नांव । तिन्हीं लोकीं ॥१४॥
निवात -कवच । मारिलें असुर । जिंकिला शंकर । संग्रामीं तूं ॥१५॥
झाले तुजपुढें । गंधर्व बापुडे । पौरुष चोखडें । ऐसें तुझें ॥१६॥
काय सांगूं तुझ्या । प्रभावाचें मान । त्रैलोक्य हि सान । वाटतसे ॥१७॥
तो तूं आज येथें । सांडोनियां शौर्य । रडतोसी काय । अधोमुख ॥१८॥
पाहें तूं अर्जुन । तुज आकळून । करावें का दीन । कारुण्यानें ? ॥१९॥
सूर्यातें अंधार । ग्रार्सील का वीरा । भिईल का वारा । मेघालागीं ॥२०॥
किंवा अमृतासी । आहे का मरण । अग्नीतें सर्पण । गिळी काय ? ॥२१॥
संसर्गाची बाधा । होवोनि मरेल । काय हालाहल । सांगें मज ॥२२॥
किंवा मिठानें का । पाणी पाझरेल । बेडूक गिळील । भुजंगासी ॥२३॥
सिंहाशी जंबूक । कैसा झगडेल । ऐसें का घडेल । अघटित ॥२४॥
अघटितासी ह्या । परी साचपणा । आज तूं अर्जुना । आणिलासी ! ॥२५॥
पार्था , अजूनी हि । धरोनियां धीर । तोडीं हा सत्वर । मोह -पाश ॥२६॥
होई सावधान । सांडीं मूर्खपण । ऊठ चाप -बाण । सज्ज करीं ॥२७॥
नको नको ऐसें । रणीं हें कारुण्य । आहेस तूं सुज्ञ । धनुर्धरा ॥२८॥
करोनि विचार । सांगें धनंजया । संग्रामीं ही दया । योग्य काय ॥२९॥
येणें इहलोकीं । तुझा दुर्लौकिक । आणि परलोक । अंतरेल ॥३०॥




टिपण : 

'श्री भगवानुवाच' असा गीतेमधील उल्लेख प्रथमच ह्या श्लोकात आला आहे. श्रीकृष्णाला भगवान हे संबोधन वापरले आहे. 'ब्रह्मेति, परमात्मेति भगवानिति शब्द्यते' ह्या श्रीमद्भागवतातील भूमिकेशी सुसंगत असा हा उल्लेख आहे. स्थल-काल-कारण अशा मर्यादांच्या पलिकडे असलेल्या शक्तिमानाचे हे सूचन आहे. 'पूर्ण षड्गुणवैभव । तो भगवान्‍ देवदेव ।' असे श्री वामनपंडितांनी ह्याच अर्थाने म्हटले आहे.



श्लोकाच्या भाषांतरात कश्मलं ह्या शब्दाचा अर्थ मोह असा दिलेला आहे. कश्मलं ह्या शब्दाच्या अनेक अर्थांपैकी ही अर्थछटा येथे वापरली आहे. मोनियर विल्यम्स ह्यांनी 'कश्मलं' ह्या अव्ययाचे भाषांतर pusillanimity (contemptible fearfulness) असे केले आहे. आपट्यांनी impure, dirty, sin (= पाप) असे अर्थ दिले आहेत पण ह्या श्लोकाच्या संदर्भात त्यांनी दिलेला अर्थ 'पाप' असा आहे. विनोबांनीही गीताईमध्ये पाप हाच अर्थ घेतलेला आहे.


ह्या संदर्भात डॉ. गजानन खैर आपल्या विवेचनात म्हणतात की जीवनातले महत्त्वाचे प्रश्न उत्कटतेने अंतर्भूत झालेली घटना गीताकारांनी प्रारंभी घेतलेली आहे. सुख-दुःख हा मानसशास्त्राचा विषय आहे तर पाप-पुण्य किंवा सदाचार-दुराचार हा नीतिशास्त्राचा विषय आहे.

दुःख आणि पाप ह्या दोन संकल्पनांची तर्कशुद्ध मीमांसा करणा-या गीतेने प्रारंभीच 'कश्मलं' असा अर्थगर्भ शब्द योजिलेला आहे.
 

Thursday, March 9, 2017

Bhagavad Gita 2.1 भगवद्गीता - करुणा-ग्रस्त अर्जुन

श्रीमद्‌भगवद्‌गीता : दुसरा अध्याय (सांख्ययोग)
मूळ दुसऱ्या अध्यायाचा प्रारंभ
अथ द्वितीयोऽध्यायः
अर्थ
दुसरा अध्याय सुरु होतो.  

गीताई
संजय म्हणाला
असा तो करुणा-ग्रस्त घाबरा अश्रु गाळित ।
करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला ॥ १ ॥  

मूळ श्लोक
सञ्जय उवाच
तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम्‌ ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ २-१ ॥  

संदर्भित अन्वयार्थ
सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, तथा = तशाप्रकारे, कृपया = करुणेने, आविष्टम्‌ = व्याप्त, अश्रुपूर्णाकुलेक्षणम्‌ = ज्याचे डोळे अश्रूंनी युक्त व व्याकूळ झालेले आहेत, (च) = आणि, विषीदन्तम्‌ = शोकयुक्त (अशा), तम्‌ = त्या(अर्जुना)ला, मधुसूदनः = भगवान मधुसूदन, इदम्‌ = हे, वाक्यम्‌ = वचन, उवाच = म्हणाले ॥ २-१ ॥  

अर्थ
संजय म्हणाले, अशा रीतीने करुणेने व्याप्त, ज्याचे डोळे आसवांनी भरलेले व व्याकूळ दिसत आहेत, अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले. ॥ २-१ ॥

TRANSLATION

Sanjaya said: Seeing Arjuna full of compassion and very sorrowful, his eyes brimming with tears, Madhusudana, Krsna, spoke the following words.

 
वामनपंडितांची गीतार्थबोधिनी

समश्लोकी
कृपाविष्ट तसा पार्थ आशीं नेत्रांत दाटली
बोले विषादयुक्तातें त्यातें हें मधुसूदन ॥
आर्या
संजय म्हणे किरीटी साश्रुसखेदहि बहूकृपावंत
होतां मधुसूदन तो बोले वचनें तयासि भगवंत ॥
दोहा
लेऊ सास असुवाभरें अर्जुन करुणाभाय
बहुबिखादसों जुगत लखी बोले श्री जदुराय ॥
ओवी
संजय म्हणे धृतराष्ट्रातें । अर्जुन वेष्टिला मोहें बहुतें ।
अश्रुपात आलें नेत्रांतें । देखोनि बोलिला श्रीकृष्ण ॥
अभंग
श्री गुरुव्यासाचा । शिष्य सद्विद्येचा । धृतराष्ट्रदेवाचा । –तोषदानी ॥1॥
बोले राया देव । उघड अपूर्व । तरी हें वैभव । भोक्ता होसी ॥2॥
कृपेनें व्यापीला । सांडित अश्रूला । येथें पार्थ भ्याला । विषादानें ॥3॥
मग मधुरिपू । शांतवी अमूपू । शांतवावें वपू । तुका म्हणे ॥4॥

श्री दीनानाथ भार्गव 'दिनेश' कृत श्रीहरिगीता

संजय ने कहा - 
ऐसे कृपायुत अश्रुपूरित दुःख से दहते हुए ।
कौन्तेय से इस भांति मधुसूदन वचन कहते हुए ॥ २ । १ ॥
ज्ञानेश्वरीतील ओव्या - 

मग संजयो म्हणे रायातें । आइकें तो पार्थु तेथें । शोकाकुल रुदनातें । करितुसे ॥ १॥

तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद्भुत । तेणें द्रवले असे चित्त । कवणेपरी ॥ २ ॥

जैसें लवण जळें झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले । तैसे सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ॥ ३॥

म्हणोनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला । जैसा कर्दमीं रुपला । राजहंस ॥ ४ ॥

तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अतिजर्जरु । देखोनि । शार्गङधरु । काय बोले ॥ ५ ॥

वामनपंडितांच्या यथार्थदीपिकेतील एक ओवी अशी आहे -
हा "न करी म्हणे कदन" । परी सारथी केला मधुसूदन ।
मधुमुरनरककैटभमर्दन । तो का सोडितो?

स्वामी स्वरूपानंदांची अभंग ज्ञानेश्वरी-
मग रायालागीं । म्हणे तो संजय । पुढें झालें काय । ऐकें आतां ॥१॥
रणांगणीं पार्थ । ऐशापरी खिन्न । होवोनि रुदन । करुं लागे ॥२॥
उपजला चित्तीं । मोह विलक्षण । सर्व आप्तजन । देखोनियां ॥३॥
तेणें त्याचें चित्त । द्रवोनियां गेलें । जलें पाझरलें । जैसें मीठ ॥४॥
हृदय सधीर । परी विरमलें । वातें झळंबलें । अभ्र जैसें ॥५॥
किंवा राजहंस । कर्दमीं रुतावा । मग तो दिसावा । म्लान -मुख ॥६॥
तैसा दिसे पार्थ । अति कोमेजला । कारुण्यें व्यापिला । म्हणोनियां ॥७॥
देखोनि तो ऐसा । महा -मोहें ग्रस्त । तयासी श्रीकांत । काय बोले ॥८॥

टिपण :
अर्जुनाची जशी अवस्था झालेली आहे तशी अवस्था सामान्य प्रापंचिक माणसाची अनेकदा होते. मोहप्रसंगी माणसाने कसे वागावे हे अर्जुनाला उपदेश करण्याच्या मिषाने सांगण्याचा गीताकारांचा उद्देश आहे.
एखादा शब्द अडला की आपण तो कोशात बघतो. त्याचप्रमाणे जीवनात काही अडचण आली तर गीतेचा संदर्भ घ्यावा असे
गांधीजी म्हणत असत व ह्याच अर्थाने त्यांनी गीतेला धर्मकोश असे म्हटले आहे.

भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद ह्यांनी वरील श्लोकातील मधुसूदन हा शब्द महत्त्वाचा आहे असे म्हटले आहे. मधु (मोहरूपी) दैत्याचा नाश करणारा असे कृष्णाचे नाव गीताकारांनी येथे योजिले आहे हे सूचक आहे.

श्री. कुंदर दिवाण ह्यांच्या विष्णुसहस्रनामचिंतनिकेमध्ये मधुसूदन ह्या नावावरील चिंतनात असाच अर्थ दिलेला आहे. भगवंतांची नामे `गौणानि' आणि `विख्यातानि' अशी आहेत आणि मधुसूदन ह्या नावातील मधु हा दैत्य कोणाचा मुलगा किंवा कोणाचा कोण होता ह्यापेक्षा त्याचा मोहरूप, कामरूप दैत्य असा `गौण' (गुणवाचक) अर्थ घ्यायला हवा असे ते म्हणतात.

अर्जुन ज्या करुणेने ग्रस्त झालेला आहे ती करुणा सात्त्विक नाही असे प्रतिपादन श्री. बाळकोबा भावे ह्यांनी आपल्या गीता तत्त्वबोध ह्या ग्रंथामध्ये केलेले आहे. सात्त्विक करुणेने भारलेल्या माणसाला मानसिक अस्वस्थता सतावत नाही. ह्या उलट अर्जुन अस्वस्थ झालेला आहे त्यामुळे त्याच्या करुणेचे मूळ मोहात आहे असे त्यांनी म्हटले आहे. स्वामी चिन्मयानंदांनी अर्जुनाची ही despondency म्हणजे ''tearless weeping is a climax of hysterical attack'' असे म्हटले आहे. बाळकोबांप्रमाणेच त्यांनीही ह्या भावनेला 'misplaced pity' असे नाव दिलेले आहे.

पांडुरंगशास्त्री आठवले आपल्या गीतामृतम्‌ ह्या ग्रंथात अर्जुनाला झालेल्या विषादाची जातकुळी `योगा'ची आहे हे निदर्शनास आणून देतात. इतका उत्कट विषाद माणसाला वैराग्य आणतो, भक्तिची कास धरण्यास आणि सत्यज्ञान संपादन करण्यास उद्युक्त करतो म्हणून तो `विषादयोग' होय. `जो त्रिविधतापे पोळला । तोचि अधिकारी योग्य झाला । परमार्थासी ।।' हे दासवचनही `विषादयोग' हा एक प्रकारचा 'अधिकारयोग' असल्याचे सूचित करते.

ह्याच दिशेने डॉ. रवीन थत्ते ह्यांनी The Genius of Dnyneshwar ह्या आपल्या ग्रंथातील 24 व्या प्रकरणात ह्याचा ऊहापोह केलेला आहे. नित्शेज्‌ ओव्हरमॅन, एब अँड टाईड असे त्याचे शीर्षक आहे. पुनरुज्जीवन प्राप्त होण्यापूर्वीच्या नैराश्याच्या, विषादाच्या आणि आत्मक्लेशाच्या भरती ओहोटीच्या लाटांमधून ह्या ओव्हरमॅनला जावे लागते आणि नंतर योग्य वेळी त्याला पुनरुज्जीवन प्राप्त होते. ही संकल्पना त्यांना अर्जुनाच्या झळंबणार्‍या हृदयाशी नाते सांगणारी वाटते. ''His very salt gone to water...'' असे ज्ञानेश्वरांच्या ओवीचे सुंदर भाषांतर त्यांनी केले आहे.

God Talks With Arjuna ह्या गीतेवरील ग्रंथामध्ये श्री श्री परमहंस योगानंद ह्यांनी गीता हा मानवाच्या आध्यात्मिक प्रवासाचा मार्गक्रम असल्याचा विचार मांडलेला आहे. ह्या श्लोकात वर्णिलेली अर्जुनाची अवस्था ह्या मार्गावर प्रवास सुरू करणार्या पांथस्थाची प्रारंभिक अवस्था आहे असे ते म्हणतात. ह्या अवस्थेत लौकिकामध्ये आसक्ती उरलेली नसते पण अलौकिकाची आसही लागलेली नसते. इंद्रियसुख किंवा ध्यानधारणा ह्या दोहोंचाही आनंद त्याला घेता येत नाही. म्हणून साधक किंकर्तव्यमूढ झालेला असतो.

Bhagavad Gita भगवद्गीता - गीतेच्या अभ्यासाची काही साधने


1. विनोबांची गीताई
2.  गीतेतील श्लोकांचा अन्वयार्थ
3. श्री दीनानाथ भार्गव 'दिनेश' कृत श्रीहरिगीता
4. ज्ञानेश्वर महाराजांची भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी
5. स्वामी स्वरूपानंदांची अभंगज्ञानेश्वरी
6. श्री वामनपंडित ह्यांची यथार्थदीपिका